#IPL2021 #KKRvDC : कोलकाताने दिल्ली जिंकली

शारजा – सुनील नरेनची अष्टपैलू कामगिरी व लॉकी फर्ग्युसनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर कोलकाताने आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दुसऱ्या पर्वात 10 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून, प्ले ऑफच्या आशाही कायम राखल्या आहेत.

नाणेफेक जिंकत कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. कोलकाताच्या अचूक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव 20 षटकांत 9 बाद 127 धावांवर रोखला गेला. स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी प्रत्येकी 39 धावांची खेळी केली. सलामीवीर शिखर धवनला लॉकी फर्ग्युसनने बाद केले. धवनने स्मिथसह 35 धावांची सलामी दिली. धवनने आपल्या 24 धावांच्या खेळीत 5 चौकार ठोकले.

त्यानंतर श्रेयस अय्यर सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथला फर्ग्युसनने बाद केले. आपल्या फलंदाजीने यंदा सातत्याने चर्चेत आलेल्या व्यंकटेश अय्यरने गोलंदाजीतही चमक दाखवताना शिमरॉन हेटमायरला बाद करून आयपीएलमधील पहिला बळी मिळवला. त्यानंतर पंत वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाने जबाबदारीने खेळ केला नाही.

संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच दिल्लीने सहा फलंदाज गमावले होते. त्यानंतर मात्र पंतने रविचंद्रन अश्‍विनसह संघाचे शतक फलकावर लावले. अखेरच्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर हे दोघेही बाद झाले. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसन, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचीही सुरुवात चांगली झाली नाही. भरात असलेला सलामीवीर व्यंकटेश अय्यर लवकर परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीनेही निराशा केली. त्यामुळे 10 षटकांत कोलकाताला 2 बाद 67 धावांपर्यंत मजल मारता आली. शुभमन गिल व कर्णधार इयान मॉर्गनही अपयशी ठरले. 12 षटकांत 4 बाद 69 अशी कोलकाताची स्थिती बनली होती.

दिनेश कार्तिक आणि नितीश राणा खेळत असताना कोलकाताला 36 चेंडूत 32 धावांची आवश्‍यकता होती. त्याचवेळी आवेश खानने कार्तिकला बाद केले. त्याचवेळी गोलंदाजीत सरस कामगिरी केलेल्या सुनील नरेनने राणाला सुरेख साथ देत आवश्‍यक धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 9 बाद 127 धावा. (स्टिव्ह स्मिथ 39, ऋषभ पंत 39, शिखऱ धवन 24, लॉकी फर्ग्युसन 2-10, सुनील नरेन 2-18, व्यंकटेश अय्यर 2-29). कोलकाता नाईट रायडर्स – 18.2 षटकांत 7 बाद 130 धावा. (शुभमन गिल 30, सुनील नरेन 21, नितीश राणा नाबाद 36, आवेश खान 3-13).

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.