दुबई – कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आयपीएलमध्ये आपल्या उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे कुलदीप यादव भारतात परतला आहे. तो आता देशांतर्गत स्पर्धांनाही मुकण्याची शक्यता आहे.
कुलदीप कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. अर्थात आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याला सुमार कामगिरीमुळे अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळालेली नव्हती. सरावादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकेल असे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही.
कुलदीप यादवच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून, तो पुढील 4 ते 6 महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. दुखापत बरी झाल्यानंतर त्याला फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली सराव करत तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येईल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून तो श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी त्याने आपला अखेरचा एकदिवसीय तसेच टी-20 सामना खेळला होता.