मुंबई महापालिका ताज हॉटेलवर मेहेरबान

पालिका अधिकऱ्यांकडून कोट्यवधींची आकारणी लाखांवर

मुंबई – मुंबई महापालिकेचे अधिकारी ताज हॉटेलवर मेहेरबान झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कुलाबा येथील ताज हॉटेलने महापालिकेच्या रस्त्याचा कब्जा केला असून याप्रकरणी 9 कोटींची आकारणी रक्कम बीएमसीला जमा करायची होती. मात्र अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमत करुन ही रक्कम 62 लाखांवर आणल्याचा गंभीर आरोप महापालिका विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी स्थायी समिती आणि सभागृहालाही अंधारात ठेवले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ताज हॉटेलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेपासून सुरक्षिततेच्या कारणाखाली ताज हॉटेल व्यवस्थपनाने ताज समोरील रस्ता ताब्यात घेतला होता. त्यामुळे समोरील रस्त्यावर बाहेरील वाहनांना पार्किंगला मनाई आहे. मात्र ताजकडूनच मनमानी करुन पार्किंगसाठी रस्त्याचा वापर केला जातो. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण महापालिकेने केले. त्यामुळे मागील दहा वर्षात रस्ता वापरल्याप्रकरणी 9.85 कोटी रुपयांची आकारणी ताज हॉटेलला पाठवली.

ताज हॉटेलने ही रक्कम भरण्यास नकार दिला. प्रशासनाने यानंतर स्थायी समिती व महापालिका सभागृहाला विचारात न घेता परस्परपणे ही रक्कम 4 कोटी आणि त्यानंतर 62 लाखांवर आणली. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच कारभार झाल्याचा आरोप रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत उपस्थित केला.

मुंबईकरांकडून एक रुपया न सोडणारी मुंबई महापालिका ताजवर मेहरबान का? असा सवाल केला. प्रशासनाकडून महापालिका अधिनियमांचे उल्लंघन आणि स्थायी समितीच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम केले जात असल्याचे ते म्हणाले. स्थायी समिती अध्यक्षांनी या गंभीर प्रकरणाचा यानंतर खूलासा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)