मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. राऊत यांना आज, शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत थेट भूमिका मांडली.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढवणार असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना राऊत यांनी, “आदित्य ठाकरेंचं नेतृत्व या महानगर पालिका निवडणुकीत लाभलं तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट ठरेल.” असं उत्तर देत शिवसेना या तयारीत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेद्वारे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांचा नारळ अप्रत्यक्षरीत्या फोडला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेवर जहरी टीका करताना दिसतायेत. महापालिका निवडणूक भाजप राणे यांच्या नेतृत्वाखाली लढेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
अशातच संजय राऊत यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढण्याबाबत केलेलं वक्तव्य राजकीयदृष्टीने महत्वपूर्ण आहे. राणे यांनी अटकेची कारवाई झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिशा सॅलीन मृत्यूप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हणत यामध्ये एका युवा नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला होता.
राणे थेट ठाकरे कुटुंबावर हल्ला करत असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर भाजपचे नारायण राणे असा रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या भाजप विरुद्ध शिवसेना या सामन्यासोबतच राणे समर्थक विरुद्ध शिवसैनिक असाही सामना पाहायला भेटेल असंही बोललं जातंय.