मुंबई – जोहान्सबर्ग थेट विमानसेवेसाठी प्रयत्नशील- अँड्रिया कून

मुंबई : दक्षिण अफ्रिकेकरिता मुंबई अतिशय महत्वाचे शहर असून येथील अनेक उदयोजकांनी दक्षिण अफ्रिकेत गुंतवणूक केली आहे. दक्षिण अफ्रिकेला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई- जोहान्सबर्ग थेट विमान सेवा सुरु झाल्यास त्याचा दोन्ही देशांना लाभ होईल.

त्यामुळे थेट विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे दक्षिण अफ्रिकेच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अँड्रिया कून यांनी राज्यपालांना सांगितले. अँड्रिया कून यांनी मंगळवारी (दि. ) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतून सत्याग्रहाला सुरुवात केली तसेच वर्णविद्वेषाविरुद्ध लढ्याला पाठींबा दिल्याचे अँड्रिया कून यांनी सांगितले. भारत – दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये सर्वच क्षेत्रात सहकार्य वाढत असून ब्रिक्‍ससह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उभय देश सहकार्य करीत आहेत.

आज दक्षिण अफ्रिकेत मूळ भारतीय वंशाचे अनेक लोक राहत असून तेथील समाजकारण- अर्थकारणात मोठे योगदान देत असल्याचे कून यांनी यावेळी सांगितले. मुंबई- जोहान्सबर्ग थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी कून यांना दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.