राजस्थानला स्मिथ पावला, मुंबई इंडियन्सवर 5 गडी राखून विजय

जयपूर – कर्णधार स्टिव स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या दमदार खेळीच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 5 गडी राखून विजय मिळविला. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पूर्ण करत “प्ले ऑफ’मधील आपला आशा कायम ठेवल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत स्टिव स्मिथने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूने रियान परागनेही चांगली साथ दिली. स्मिथने नाबाद 59, तर परागने 43 धावा केल्या.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्‍य रहाणे या सामन्यातही झटपट बाद झाला. संजू सॅमसनने काही सुरेख फटके लगावले. मात्र राहुल चहरने त्याला घरचा रस्ता दाखविला. यानंतर धोकादायक बेन स्टोक्‍सचा अडसरही चहरनेच दूर केला. एकाच षटकात दोन गडी बाद करत चहरने सामन्यात रंगत आणली. यानंतर स्टिव स्मिथ आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईकडून राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही. चहरने 3, तर बुमराहने एक बळी घेतला.

तत्पूर्वी, सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक (65) आणि सूर्यकुमार यादव (34), हार्दिक पांड्या (23) यांची खेळी याच्या बळावर मुंबईने 20 षटकात 5 बाद 161 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथ याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक ठरली. कर्णधार रोहित शर्मा बचावात्मक फटका खेळण्यासाठी पुढे आला पण त्याला चेंडू नीट समजू शकला नाही. त्यामुळे गोलंदाजाच्या हाती झेल देत तो माघारी परतला. त्याने केवळ 5 धावा केल्या.

यानंतर, मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने चौकार-षटकारांची आतषबाजी करत 34 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. रोहित माघारी परतल्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार यादव फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. 33 चेंडूत 34 धावा काढून तो माघारी परतला. दमदार अर्धशतक केल्यानंतर फटकेबाजी करताना क्विंटन डी कॉकही माघारी परतला आणि मुंबईला तिसरा धक्का बसला. त्याने 47 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार खेचत 65 धावा केल्या. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा कायरन पोलार्ड स्वस्तात बाद झाला. 1 षटकार लगावत त्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र तो पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत होऊन 10 धावांवर माघारी परतला.

हार्दिक पांड्याने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत 15 चेंडूत 23 धावा केल्या. पण तो 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. अष्टपैलू बेन कटिंगने 1 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 13 धावा केल्या आणि मुंबईला 161 पर्यंत मजल मारून दिली. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने 2, तर जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.