शिवसेनेचे अंधेरी पूर्व विभागाचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या 52 व्या वर्षी आमदार लटके यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते दुबईत कुंटुबीयांसह फिरायला व त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शिवसेनेचा पुर्व अंधेरीचा एक मोठा चेहरा गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुर्व अंधेरीमध्ये त्यांचे काम हीच त्यांची ओळख होती. राज्यात मिनी विधानसभा स्वरूप असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. अशातच सेनेचा एक नेता हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आमदार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांचा पराभव करून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम पटेल यांचा पराभव केला. याशिवाय ते अनेकवेळा बीएमसीमध्ये नगरसेवकही राहिले आहेत.
आमदार लटके यांच्या निधनानंतर शिवसेनेत शोककळा पसरली आहे. त्यांच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसला आहे. आमदार काही दिवसांपासून कुटुंबासह दुबईत होते. दरम्यान, बुधवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.