नारायण सातपुते
रेठरे बुद्रुक – वाढदिवस तसेच लग्नाचा वाढदिवस साजरा करणे हल्ली फॅशन बनली आहे. तरुणाईसह ग्रामीण भागातील सर्रास लोकं या फॅशनच्या मोहात पडली असल्याचे चित्र हल्ली पहावयास मिळत आहे. तसेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या अर्धांगीनी सोबतचे फोटो सोशियल मिडीयावर व्हायरल करणे आणि लाईक मिळविणे हे हल्ली प्रतिष्ठेचे मानले जात आहे.
उन्हाळी सुट्टी म्हटलं की सेलिब्रेशन पार्ट्याचा धुमधडाका असतोच आणि पार्टीसाठी निमित्त असावे लागते. अशातच उन्हाळी सुट्टी म्हणजे लग्नाचा हंगाम असतो. नोकरदार मंडळींना सुट्टीत लग्न कार्य उरकून घेण्याची गडबड असते त्यामुळे बहुतांशी लग्न मे जून महिन्यात होतात आणि दरवर्षी मे जून महिना म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाचा असतो. लग्नाचा वाढदिवस साजरा करणे ही फॅशन सुरुवातीला शहरी भागात जादा प्रमाणात पहावयास मिळायची, परंतु आता हीच फॅशन ग्रामीण भागातही सर्वत्र पहावयास मिळत आहे.
आधुनिकीकरनामुळे वेगवेगळे शोध लागत गेले. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. गेली काही वर्षांसांपासून लग्नाचे वाढदिवस सोशियल मीडियावर झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे वर्षभर आपल्या अर्धांगिनी सोबत व्यवहार फारसे समाधानकारक नसले तरी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवरोबा मंडळी आपल्या पत्नीला विशेष उपमा आणि वेगवेगळी विशेषणे देऊन पत्नीला खुश करण्यात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्ट्या सध्या जोमात सुरू असून हॉटेल आणि विविध पर्यटनस्थळ या पार्ट्यानि गजबजून जात आहेत. या दिवसाचा वधू- वर मंडळींचा थाट जोशात असतो, त्याला पत्नीची साथ वाखाणण्याजोगी असते. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना तरुण असो वा वयस्कर जोडपं खुशीत असल्याचे पहावयास मिळते. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतो. हा दिवस हल्ली सोशियल मीडियावर प्रसिद्ध करणे प्रत्येकाची आवड बनली आहे. वाढदिवसांचे सेलिब्रेशन जरूर असावं पण त्यात मी पना नसावा, सेलिब्रेशन तर करावंच त्यामुळे पती पत्नीमधील सहसंबंध अधिक घट्ट होतील आणि पति पत्निचे सहजीवन सुखकर होईल. ते म्हणताता ना, उभयतांचे सप्तपदीच नातं सात जन्माएवढं गहिरं असावं, ना कधी तू रुसावं ना तीनं कधी रुसावं, थोडस भांडण असावं पण भरपूर प्रेम असावं.