पुणे- करोनाचे संकट असतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून शुल्कासाठी पालकांकडे तगादा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. अशा स्थितीत शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृहाने करोनाचा प्रादुर्भाव पाहता संस्थेतील चार इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे शुल्क यावर्षी 15 टक्के कमी करण्याचा निर्णय घेत अन्य शैक्षणिक संस्थेपुढे आदर्श ठेवला आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या सहकारनगर येथील मुक्तांगण इंग्लिम मीडियम स्कूलमधील 3 हजार 700 विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेक पालकांचे रोजगार गेले असून, वेतन कपातीला सामोरे जावेल लागले. त्यामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. करोनाचे संकट लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृहाने सामाजिक बांधिलकी जपत यावषी 15 टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. संस्थेतील सहकारनगरसह नाशिक, मुंबई, नवी मुंबई अशा चार शाळांतील जवळपास 18 हजार विद्यार्थ्यांचे 15 टक्के शुल्क कमी होणार आहे. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे.
करोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षातील 15 टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये, हीच संस्थेची भूमिका आहे.
प्रा. राजेंद्र कांबळे कार्यवाह, पुणे विद्यार्थी गृह