कसबा मतदारसंघात ओपन जिमला प्राधान्य देणार
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी शनिवारी मॉर्निंग वॉक घेत अभिनव पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारसंघात ओपन जिमची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली.
तर, कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक चांगली उद्याने असून या ठिकाणी चांगल्या दर्जाची तसेच नागरिकांना उपयुक्त अशा ओपन जिम उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मुक्ता टिळक यांनी मतदारांना दिले. टिळक यांनी शनिवारी सकाळी वर्तक बाग, सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान, लोकमान्य जॉगिंग पार्क येथे भेट दिली. तसेच व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशीही चर्चा केली. मतदारसंघाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष राजू परदेशी,अमित कंक, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली नाईक, नगरसेविका गायत्री खडके, दीपाली मारटकर, प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिळक म्हणाल्या, कसबा विधानसभा मतदारसंघात असलेल्या अनेक उद्यानांमध्ये नागरिक सकाळी तसेच संध्याकाळी व्यायामासाठी येतात. त्यांच्यासाठी ओपन जीमचे साहित्य महापालिकेच्या माध्यमातून बसविण्यात आले आहे. मात्र, जागा तसेच इतर अडचणींमुळे जीमच्या साहित्याची संख्या कमी असल्याने नागरिकांना एकाच वेळी त्याचा फायदा घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तिथे नवीन साहित्य बसविणे तसेच प्रभागात नागरिकांना सोयीस्कर पडतील, अशा जागा निश्चित करून ओपन जीमचे साहित्य बसविण्यावर आपला भर राहणार आहे.
माधुरी मिसाळ यांची भेट
दरम्यान, पर्वती विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनीही शनिवारी सकाळी सारसबागेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी या दोन्ही उमेदवारांची भेट झाली. त्यानंतर व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी या दोन्ही उमेदवारांना एकाच वेळी शुभेच्या दिल्या. तसेच दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासनही यावेळी मतदार महिलांकडून देण्यात आले.