नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंग याच्यावर तिहार कारागृहात बलात्कार करण्यात आला होता, अशी माहिती त्याच्या वकील अंजना प्रकाश यांनी सर्वोच्च न्यायलयाला दिली. राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळण्याविरोधात मुकेशने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
त्याला तिहारमध्ये 2013 मध्ये ठेवण्यात आले. तेंव्हापासून त्याच्यावर आतील कैद्यांकडून बलात्कार करण्यात येत आहेत. तो कारागृहात जिवंत मरण अनुभवत आहे. त्याच्या एका सहआरोपीची आत्महत्या ही खरे तर हत्या होती. पण त्याची दखल या यंत्रणेने घेतली नाही, असे प्रकाश म्हणाल्या.
केहरसिंग खटल्याचा संदर्भ देत प्रकाश म्हणाल्या, राष्ट्रपतींनी सर्व रेकॉर्डची पडताळणी केली पाहीजे. आणि मग त्यातून ते शिक्षा अथवा गुन्ह्यासंदर्भात वेगळ्या निष्कर्षापर्यंत येऊ शकतात. या न्यायिक आदेश अथवा नोंदीत फेरफार करता येत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रत्येकवेळी तुम्ही तुमची बुध्दी वापरली पाहिजे. कारण तुम्ही एखाद्याच्या आयुष्याच्या खेळत असता, असा युक्तीवाद प्रकाश यांनी केला.
न्या. भानुमती यांनी तुम्ही एकांतवास मागण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. त्यावेळी प्रकाश म्हणाल्या, मृत्यू ते जन्मठेप यामधील संवादाचे ते कारण आहे. त्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींकडे देण्यात आला नव्हता.
न्या भानुमथी त्यावर म्हणाल्या, याचिकाकर्त्याला एकांतवासात ठेवता येणार नाही. त्यावर प्रकाश यांनी सुनील बत्रा आणि दिल्ली प्रशासनातील खटल्याचा संदर्भ दिला.
हे कायद्याला धरून आहे का? त्यावर प्रकाश म्हणाल्या हाच मुद्दा आहे, मुकेशला एकांतवासात ठेवले होते.