मुंबई – बॉलीवुडचे सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले आहे. कमला छाबरा असे त्यांच्या आईचे नाव होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल (गुरुवारी) त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्तानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कमला छाबरा यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून गंभीर होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुकेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ही दु:खद माहिती दिली. एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘आईच्या आत्म्याला शांती लाभो’. त्यांच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.
मुंबईतील ओशिवरा येथे आज शुक्रवार कमला छाबरा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुकेश छाबरा यांनी सलमान, शाहरुख खानसह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे. ‘कीक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ असे अनेक चित्रपट त्यांनी केले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल होते. अनेकांना त्यांनी संधी मिळवून दिल्याने त्यांचे सर्व कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या आईच्या निधनाची माहिती कळताच फराह खान, दीपिका पदुकोण आणि नुपूर सेनन हे कलाकार मुकेश यांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात आले होते.