Reliance| मुकेश अंबानी संचलित रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजारातील तेजीचा चांगलाच फायदा होत आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव आज 1.88 टक्क्यांनी वाढून 2,957 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. त्यामुळे एक वेळ या कंपनीचे बाजार मूल्य 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते.
मात्र बाजार बंद होताना ते या पातळीच्या किंचित कमी पातळीवर आले. दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअरचा भाव वाढल्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य एक लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स कंपनी नंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एलआयसी, स्टेट बँक, एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी या कंपन्यांचा नंबर लागतो.
सरलेल्या महिन्यात या कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे बाजार मूल्य 18 लाख कोटी रुपये होते. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत या कंपनीचा नफा नऊ टक्क्यांनी वाढून 17,265 कोटी रुपये इतका झाला आहे. तो तुलनेने कमी असला तरी आगामी काळात या कंपनीचा नफा आणि उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकाअगोदर शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी असते. त्याचा फायदा या कंपनीला होत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान मंगळवारी शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. बँका आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. या तेजीचा फायदा आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, विप्रो, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांना झाला. फक्त पाच कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात घट झाली. यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, काल महागाई कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये भारतीय भांडवल बाजारात व्याजदर कपातीची शक्यता खुली होणार आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादन काही प्रमाणात कमी झाले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून मंगळवारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
मुख्य निर्देशांकात वाढ
दरम्यान, मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 482 अंकांनी वाढून 71,555 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 127 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी वाढून 21,743 अंकांवर बंद झाला. गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांक वाढल्याचे सांगण्यात आले. मात्र अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर काल परदेशी गुंतवणूकदारांनी 126 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.