पुणे :- आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नितीन किर्तने, सागरिका फडके यांनी तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत प्रसनजीत पॉलने विशाल विष्णूचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 45 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन किर्तनेने दुसऱ्या मानांकित यती गुजरातीचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला एकेरी 35 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सागरिका फडकेने साफीन शेखचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
50 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत राजेश गणपतीने नवीन अगरवालचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. 45 वर्षांवरील गटात दुहेरीत अंतिम फेरीत मुकुंद जोशी व नितीन किर्तने यांनी बालकुमार केपी व बलराज केपी यांचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत राधिका कानिटकर व आदित्य कानिटकर या जोडीने सोनल फडके व आकाश काळे यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रामा राव डोसा, हिमांशु गोसावी, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी उपस्थित होते.