पुणे – राज्यातील आणि देशातील अग्रगण्य महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या संलग्नतेने पीसीएमसी भागातील खेळाडू, प्रशिक्षक आणि टेनिसच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, अशी माहिती एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी दिली आहे.
पीसीएमसी आणि एमएसएलटीए यांच्यातील या सहकार्यामुळे पीसीएमसी क्षेत्रातील टेनिसला खूप चालना मिळेल, जी आधीपासून लोकप्रियता मिळवत आहे. पीसीएमसी भागात 22 हून अधिक कोर्ट आहेत आणि तसेच, सर्व वयोगटातील टेनिसपटूंची संख्याही चांगली आहे, पण खेळाडूंना न मिळणारा योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि चांगली स्पर्धात्मक संकल्पनेची गरज असल्याचे पीसीएमसी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
याच हेतूने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) च्या वतीने एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षांखालील राज्य मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची पुढील स्पर्धा निगडी टेनिस कोर्ट या ठिकाणी 4 ते 6 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय प्रशिक्षकांसाठी एमएसएलटीए सर्टिफिकेट व कोर्सेचे 26, 27, 28, 29, 30 जून 2022 दरम्यान आयोजन देखील करण्यात आले आहे, असे स्पर्धा संचालक नंदू रोकडे यांनी सांगितले.