MS Dhoni On IPL Retirement: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या उत्तम कामगिरीने तो नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो. महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने चेन्नई सुपर किंग्जला IPL 2023 चे विजेतेपद मिळवून दिले, हे त्यांचे T20 फ्रँचायझी लीगमधील पाचवे विजेतेपद आहे.
2023 मध्ये चेन्नईला चॅम्पियन बनवल्यानंतर धोनीने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवण्याची घोषणा केली. पुढच्या वर्षी जेव्हा आयपीएल 2024 सुरू होईल तेव्हा सर्वांच्या नजरा धोनीवर असणार आहेत. यानंतर आता धोनीने एका कार्यक्रमात त्याचा रिटायरमेंट प्लॅन सांगितला आहे.
या कार्यक्रमात एका चाहत्याने धोनीला निवृत्तीनंतर काय करणार? असा प्रश्न विचारला. यावर ‘मी अद्याप याबाबत फारसा विचार केलेला नाही. मी सध्या क्रिकेट खेळतोय. क्रिकेटनंतर काय करायचं, हे माझ्यासाठीही महत्वाचं आहे. पण एक गोष्ट निश्चित, निवृत्तीनंतर मला भारतीय सैन्यासोबत आणखी काही वेळ घालवायचा आहे. गेल्या काही वर्षांत मी हे करू शकलो नाही,’ असे धोनीने उत्तर दिले. त्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
एमएस धोनी 42 वर्षांचा झाला आहे. 2019 मध्ये तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये शेवटचा क्रिकेट खेळला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो आयपीएलमध्येच आहे. तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून गेल्या मोसमात त्याने पुन्हा एकदा आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.
गेल्या आयपीएल मोसमातही त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. या वयातही तो फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या बाबतीत इतर खेळाडूंना खूप मागे टाकत आहे. त्यामुळेच त्याने आतापर्यंत क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतलेली नाही. तो आयपीएल 2024 मध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
धोनीला लेफ्टनंट कर्नल मानद पदवी प्रदान
दरम्यान, एमएस धोनीला 2011 साली भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान केला होता. ते पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत. गेल्या दशकात तो अनेक वेळा आर्मी ड्रेसमध्ये पाहायला मिळाला होता.