नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही काळापासून जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजविले आहे. या संघाचे नेतृत्व त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने केले होते. मात्र, केवळ सध्याचा कर्णधार विराट कोहलीसह एकूण केवळ 9 खेळाडूंचा फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सोशल मीडियावर पोस्ट केले, पण त्यात धोनीच गायब असल्याचे पाहिल्यावर चाहत्यांचा उद्रेक झाला व मंडळावर टीका सुरू झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीन मुख्य स्पर्धा जिंकून देणारा कर्णधारच फोटोतून गायब झालेला दिसल्याने मंडळाला नक्की काय सिद्ध करायचे आहे, असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा, 2011 साली मुख्य एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा तर, 2013 सालातील चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीनही स्पर्धा जिंकल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा म्हणून जर हा फोटो पोस्ट केला आहे तर त्यात धोनी का नाही, असा प्रश्न चाहत्यांनी मंडळाला केला आहे.
2019 ची विश्वकरंडक स्पर्धा खेळल्यानंतर आजपर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तसेच मंडळाने आपल्या करारबद्ध खेळाडूंमध्ये देखील यंदा धोनीचा समावेश केलेला नाही. धोनी निवृत्ती घेणार अशी मंडळाला खात्री आहे का. धोनी जरी निवृत्त झाला तरीही त्याचे योगदान या फोटोच्या माध्यमातून व्यक्त करता आले असते. मात्र, मंडळाने कोणत्या मनोवृत्तीचेच दर्शन घडविले, असेही काही चाहत्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.
https://www.instagram.com/p/B99fYetgD-U/?utm_source=ig_web_copy_link
लाखो फॉलोअर्स…..
इन्स्टाग्रामवर भारतीय संघाचे करोडो फॉलोअर्स झाले असल्याचे सांगत हा फोटो पोस्ट करत मंडळाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या फोटोत कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर आहेत तर, महिला क्रिकेट संघातील स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम यादव या देखील आहेत. मात्र, त्यातून धोनी गायब झाल्याने मंडळाच्या या आभार प्रदर्शनावरच टीका झाली आहे.