पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी, तर मुख्य परीक्षा 7 ते 9 मे रोजी होणार आहे. एकूण 290 पदांसाठी ही परीक्षा होत असून, राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे आयोगाने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उपजिल्हाधिकारी (12 पदे), पोलीस उपअधीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त (16), सहायक राज्य कर आयुक्त (16), गटविकास अधिकारी (15), वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (15), सहायक कामगार आयुक्त (22), उपशिक्षणाधिकारी (25), कक्ष अधिकारी (39), सहायक गटविकास अधिकारी (17), सहायक निबंधक सहकारी संस्था (18), कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (16), सरकारी कामगार अधिकारी (54) अशा एकूण 290 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.
अर्जासाठी मंगळवारपासून सुरू
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 5 ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबरपर्यत राहील. खुल्या प्रवर्गासाठी 544 रुपये, तर मागासवर्गीय गटांसाठी 344 रुपये अर्जाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.