पुणे (व्यंकटेश भोळा)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी “ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एखाद्या पदासाठी निवड होऊनही दुसऱ्या वेगळ्या अथवा त्याच पदावर पुन्हा एकदा निवड झाल्यास त्यांना “ऑप्टिंग आऊट’द्वारे कोणत्याही एका पदभरतीतून बाहेर पडता येत आहे. हा पर्याय उपलब्ध होत असल्याने एक-दोन गुणांमुळे नोकरीची संधी डावलली जात असलेल्या उमेदवारांना अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
यापूर्वी एमपीएससीने परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे पत्रे दिले जात होते. आता पहिल्यांदा सर्वसाधारण गुणवत्ता यादी, “ऑप्टिंग आऊट’साठी विकल्पाची संधी आणि त्यानंतर अंतिम निकाल आयोगाकडून जाहीर केले जात आहे. “ऑप्टिंग आऊट’मुळे अनेक उमेदवारांना अंतिम निकालात संधी मिळत आहे. ज्या उमेदवारांना कोणतेही पद नको आहे, त्यांनी हा पसंतीक्रम निवडता येते.
यापुढे काय?
यापुढचा टप्प्पा म्हणजेच प्रतीक्षा यादी हा आहे. एमपीएससीने आगामी काळात प्रतीक्षा यादी जाहीर केल्यास निवड होऊनही पद न स्वीकारल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागांवर काम करण्याची संधी अनेक गुणवत्ताधारक उमेदवारांना मिळण्याची चिन्हे आहेत.
ऑप्टिंग आऊट म्हणजे काय?
एमपीएससी परीक्षा राज्यभरातील लाखो उमेदवार देतात. त्यात आधी निवड झालेले काही उमेदवार पुन्हा परीक्षा देतात. या परीक्षेत संबंधित उमेदवाराने निवड होऊनही अपेक्षित पद न मिळाल्याच्या कारणास्तव ते पद न स्वीकारल्यास ते पद रिक्त राहते. त्यामुळे अन्य होतकरू उमेदवारांची संधी गमावली जाते. या पार्श्वभूमीवर आयोगाने उमेदवारांकडून पदांच्या पसंतीक्रमाचे पर्याय मागवून घेऊन भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्याची पद्धत सुरू केली.