वाहनचालक त्रस्त; रात्रीच्या वेळी वाहनांच्या रांगा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगाव, निगडी, नाशिकफाटा, भोसरी परिसरातील मुख्य चौक आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रीच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्स मनमानी पद्धतीने मुख्य रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. निर्ढावलेल्या बसचालकांकडून रस्त्यावर तासन् तास उभ्या करण्यात येत असलेल्या बसमुळे कोंडी होत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्याने शाळांना सुट्टी लागली आहे. करोनामुळे दोन वर्षांनी सण-समारंभ आणि लग्नसराईचा धडाका सुरू झाल्याने गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यासाठी अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. शहरातील विविध भागांमधून या बस सुटतात. मुख्य चौकातून या बस सुटत असल्याने अनेक बस रस्त्यावरच पार्क केल्या जाता तसेच बसेसची संख्या मोठी असल्याने काही किलोमिटरपर्यंत या बसच्या रांगा लागत असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना त्याचा मोठा त्रास होत आहे.
चिंचवड येथील एल्प्रो चौक ते चिंचवगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास अनेक बस उभ्या केलेल्या असतात. एसकेएफ रस्ता ते एल्प्रो चौक व पुढे चिंचवडगावाकडे जाणाऱ्या या बस उभ्या केल्या जात असल्याने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापासून ते एल्प्रो चौक व पुढे चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
निगडी येथील लोकमान्य टिळक पुलाखाली हाच प्रकार पहावयास मिळत असून रस्त्याच्या दुतर्फा बस उभ्या केल्याने या चौकात रोजच वाहतूक कोंडी ही समस्या बनली आहे. भोसरी येथील उड्डाणपुलाखाली सायंकाळच्या वेळी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तर नाशिक फाटा येथे चौकाच्या चारही बाजूंनी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असल्याने हा चौक वाहतूक कोंडीचा अड्डाच बनला आहे.
खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांची भाडे देण्याची मानसिकता नाही. त्यांना जागा देण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात महापालिकेशी बोलणी सुरू आहे. रिव्हर व्ह्यू चौकात जागा आहे. तेथे जागा देण्याची शक्यत आहे. एल्प्रो चौकातील कोंडीवर नक्कीच पर्याय काढण्यात येईल.
– रामा राजमाने, पोलीस निरीक्षक, चिंचवड वाहतूक विभाग.