सातशे रुपयांपासून प्रति डझनाचा दर
पिंपरी – हापूस आंब्याची बाजारपेठेतील आवक गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही आंब्याचे चढे दर कायम असून सध्या एक डझन आंब्यासाठी 700 ते 1 हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. अक्षय्य तृतीया झाल्यानंतरच हापुसचे दर उतरतील, असा आंबा विक्रेत्यांचा अंदाज आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच हापुस आंब्याचे वेध लागतात. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यात आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे दर चढे असतात. मे महिन्यात विशेषत: अक्षय्य तृतीयेनंतर दर कमी होतात. पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून पिंपरी बाजारपेठेतील विक्रेते हापूस आंबा आणतात. सध्या बाजारपेठेत देवगड हापुस आंबा पाहण्यास मिळत आहे.
रत्नागिरी हापुस आंबा मोजक्याच विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. देवगड हापुसचे 1 डझनाचे दर 700 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत आहेत. या हापूस आंब्याच्या 4 आणि 5 डझनाच्या पेट्या उपलब्ध आहेत. तर, कर्नाटक हापूस 600 रुपये डझनाने मिळत आहे. सध्या हापुस आंब्याला मागणी आहे. मात्र, दर जास्त असल्याने खरेदी कमी होत असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली.
पायरी, लालबागला पसंती
हापुसचे दर सध्या चढे असल्याने नागरिकांकडून रसासाठी पायरी, लालबाग या आंब्यांना पसंती मिळत आहे. पायरी आंबा 150 रुपये किलो या दराने तर, लालबाग आंबा 100 रुपये किलो या दराने विकला जात आहे. त्या खालोखाल बदाम आंब्याला मागणी आहे. बदाम आंबा 120 रुपये किलो या दराने विकला जात आहे.