नवी मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 30 एप्रिल रोजी विविध अराजपत्रीत गटासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी एका 19 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रोहित कांबळे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरोपी कांबळे हा चिखली, पुणे येथे राहणारा आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गुन्ह्यांत वापरलेला 1 डेस्कटॉप, 1 लॅपटॉप, 3 मोबाइल , 1 इंटरनेट राऊटर हस्तगत केले आहे. आरोपीने गुन्हा करताना वापरलेला आयपी ड्रेस निष्पन्न करून त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी झालेल्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट होती आणि ती व्हायरल झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.