पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लिपिक पदासाठी पात्र ठरलेल्यांची कौशल्य चाचणीच्या नियमांविरोधात बालगंधर्व रंगमंदिर चौकात उमेदवारांनी सोमवारी आंदोलन केले. त्यानंतर आयोगाने परिपत्रक प्रसिद्ध करून मराठी की-बोर्डवरूनच कौशल्य चाचणी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र अचूक शब्दाची मर्यादा कमी करण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.
आयोगाने सुमारे 1100 लिपिक व कर सहायक पदांसाठी परीक्षा घेतली होती. यात पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी दि. 7 एप्रिल रोजी होत आहे. यात दहा मिनिटात 300 शब्द अचूकपणे टायपिंग करण्याचे निकष आहे. याचा सराव होण्यासाठी आयोगाने लिंक दिली होती. त्यात सराव करीत असताना उमेदवारांना की-बोर्ड मराठीऐवजी हिंदी भाषेत असल्याचे निदर्शनास आले. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शहर युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी आंदोलन केले. यात हिंदी ऐवजी मराठी की-बोर्ड असावा, शब्द मर्यादा कमी असावी, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.