भोपाळ – क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे, 19 नोव्हेंबरला फायनल खेळणार आहे, पण देशात सत्तेसाठीची फायनल 2024 मध्ये होणार आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीकडे केंद्रातील सत्तेसाठीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. मध्य प्रदेशात या लढतींसाठीचे मतदान उद्या दि. 17 नोव्हेंबरला होणार आहे.
दीड महिना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संपूर्ण राज्याचे दौरे केले आणि सभा आणि रोड शोमध्ये शतके ठोकली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांनी भाजपसाठी फटकेबाजी केली आहे. कॉंग्रेससाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिग्विजय सिंह यांनी जोरदार बॅटिंग केली.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोलार रोड, भोपाळ येथे केलेल्या सभेचे वर्णन करताना शिवराज सिंह म्हणाले की, ते हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यानंतर धावायचे, नंतर पुन्हा हवेत उड्डाण करायचे. त्यांनी एकूण 165 सभा घेतल्या. तर जुन्नरदेव, छिंदवाडा येथे प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख डॉ. कमलनाथ भावूक झाले. त्यांनी 114 सभा घेतल्या.
भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15, अमित शहा यांनी 21, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 14, राजनाथ सिंह यांनी 12, नितीन गडकरी यांनी 3, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 165, विष्णू दत्त शर्मा यांनी 55, भूपेंद्र यादव यांनी 7, नरेंद्र सिंह तोमर यांनी 38 सभा घेतल्या.
अन्य नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया 80, अश्विनी वैष्णव 3, प्रल्हाद पटेल 40, फग्गनसिंग कुलस्ते 18, कैलाश विजयवर्गीय 25, हिमंता बिस्वा सरमा 15 आणि कविता पाटीदार 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतलाम, सिवनी, खंडवा, सिधी, दमोह, मुरैना, गुना, सतना, छतरपूर, नीमच, बरवानी, इंदूर, बैतूल, शाजापूर, झाबुआ येथे पोहोचून इंदूरमध्ये रोड शो केला. तर गृहमंत्री अमित शहा जुन्नरदेव, जबलपूर, भोपाळ, खजुराहो, रीवा, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, करैरा, मानपुरा, भौंटी, पिचोर, श्योपूर, ग्वाल्हेर, धार, गंधवानी, बदनवार, देपालपूर, सिरोंज, चचोडा, राघोगड, चंदेरी येथे सभा घेतल्या.
कॉंग्रेसच्या 350 हून अधिक सभा
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि सचिन पायलट यांनी राज्यात 200 जाहीर सभा आणि रोड शो केले. या काळात राहुल गांधी 11, प्रियांका गांधी 11, खरगे 9, कमलनाथ 114 आणि सचिन पायलट 4 कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कमलनाथ यांच्या 114 जाहीर सभा
राहुल गांधींनी एकूण आठ जाहीर सभा, दोन रोड शो आणि एक कॉर्नर सभा घेतली. तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी नऊ सभा घेतल्या. प्रियंका गांधी यांनी 8 सभांसह 1 रोड शो केला.
माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी एकूण 114 कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान कमलनाथ यांनी एकूण 114 सार्वजनिक सभा घेतल्या. दिग्विजय सिंह यांनी मंडलम सेक्टर आणि सार्वजनिक सभांसह एकूण 50 सभा घेतल्या. तर सचिन पायलट यांनीही एकूण चार जाहीर सभा घेतल्या. आता उद्या होत असलेल्या मतदानानंतर, आपण पुन्हा सरकार स्थापन करणार असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला आहे; तर कॉंग्रेस सत्तेत पुन्हा येणार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.