नविन घरात शिफ्ट होणे

घर बदलणे हा कुठल्याही गृहिणीसाठी त्रासदायक आणि थकवा आणणारा अनुभव असतो. घर बदलताना बहुतेक गृहिणी एक सर्वसामान्य चूक करतात. त्या घरातील सामानाची बांधाबांध करतात, पण एकत्रितपणे. दुसऱ्या घरी गेल्यानंतर या वस्तू वेगवेगळ्या करता येतील, असा त्यांचा यामागे विचार असतो. मात्र, असे प्रत्यक्षात कधीच होत नाही.

नव्या घरासाठी आपण नव्या वस्तू खरेदी करणे सुरू करतो आणि दुसरीकडे जुन्या वस्तूंचा ढीग वाढतच जातो. म्हणूनच सर्वांत प्रथम कुठली गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे घर बदलण्यापूर्वीच वस्तू वेगवेगळ्या विभागून घ्याव्यात. यामुळे आपला वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होईल. तसेच, गरज नसलेले सामान दुसऱ्या घरी घेऊन जाण्यासाठी अतिरिक्‍त पैसादेखील द्यावा लागणार नाही. घर शिफ्ट करण्यापूर्वी कमीतकमी एक महिना आधीच या वस्तू विभागणे अर्थात वेगळ्या करणे सुरू केले पाहिजे. या वस्तूंची विभागणी करतांना ती पुढील पद्धतीने करावी.

क्रॉकरी, पुस्तके, वाहतूकीदरम्यान तुटू शकणाऱ्या नाजूक वस्तू, टॉयलेटसंबंधित ऍक्‍सेसरिज, बेडरूमशी संबंधित वस्तू या गोष्टी स्वतंत्र कराव्यात आणि स्वतः त्याचे निरीक्षण करावे. या वस्तूंची खरोखरच गरज आहे का, जेवढी गरज होती त्यापेक्षा अधिक वापर या वस्तूंचा झाला आहे का? या वस्तूंची दुरुस्ती करण्याची गरज आहे का? यामुळे पैसे वाचतील का? नव्या घरात या वस्तूंसाठी योग्य स्थान असेल का? या वस्तूंची एक्‍सपायरी डेट उलटून गेली आहे का? (हा विचार करण्यामागचे कारण म्हणजे, अनेक गृहिणी एक्‍सपायरी डेट उलटून गेलेल्या जॅम किंवा सॉसच्या बाटल्याही नव्या घरी घेऊन जात असतात.)

एखाद्या वस्तूचा आकार, रचना किंवा इतर बाबी पसंत नसतील तर, नव्या घरातील रचनेला त्या वस्तू शोभणाऱ्या नसतील तर त्या टाकून देणेच योग्य ठरते. यामध्ये फर्निचरपासून कपड्यांपर्यंत कुठलीही गोष्ट येऊ शकते.

साधारणत: सात वर्षांपेक्षा अधिक जुनी कागदे आणि ज्यांची कायद्याच्या दृष्टीने काहीही गरज नाही, अशी कागदे जाळावीत अथवा फाडावीत. जी मासिके अथवा पुस्तके वाचून झाली आहेत आणि जी पुन्हा वाचायची नाहीत, अशी पुस्तके मित्रांना किंवा वाचनालयाला दान करून टाकावीत. कॉलेजची पुस्तके अथवा नोट्‌स अजूनपर्यंत सांभाळून ठेवल्या असतील, तर त्याही टाकून देण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यावे. उपयोगाच्या असतील तर या गोष्टी कामवाल्या बाईकडे सुपूर्त कराव्यात अथवा एखाद्या शिक्षण संस्थेला द्याव्यात. ज्या वस्तू विकण्यायोग्य असतील आणि त्यांचे चांगले मूल्य मिळणार असेल, अशा वस्तू विकलेल्या केव्हाही चांगल्या. नव्या घरात जर नवा टिव्ही, नवी म्युझिक सिस्टिम घेणार असाल तर जुन्या वस्तू विकणेच उत्तम.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×