अबाऊट टर्न: सिनेमा

हिमांशू

राजकारण हा एक करमणूकप्रधान सिनेमा आहे, हे खुद्द राजकारणीच मान्य करू लागले ही अत्यंत सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. कोणत्याही मनोरंजनप्रधान चॅनेलपेक्षा अधिक करमणूक टीव्ही चॅनेलवर होते, याची पुरेपूर खात्री जनताजनार्दनाला पटलेली होतीच. टीव्हीवरील अनेक मालिकांच्या टीआरपीला ओहोटी लागली आणि प्राइम टाइममध्ये न्यूज चॅनेलचा भाव वधारला, याचा अर्थ लोकांचा बातम्यांमधला इंटरेस्ट वाढला असा घेतला जाऊ लागला होता. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची माहिती करून घेणं लोकांना आवडू लागले, लोक वर्तमानाविषयी जागरूक झाले, असं मानले जाऊ लागले होते. परंतु खरी कमाल न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रांचं स्क्रिप्ट लिहिणाऱ्या राजकारण्यांची होती, हे सर्वश्रुत होते.

आता ते स्पष्टपणे बोलले गेले एवढेच! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मते महाआघाडीचे सरकार हा मल्टी-स्टारकास्ट सिनेमा आहे. एकच नायक असलेल्या चित्रपटांना प्रेक्षक आता कंटाळले असून, त्यांना तीन-तीन नायक पडद्यावर पाहायला आवडतं, असं त्यांचं म्हणणं! अशोकरावांनी जनतेची नाडी अचूक ओळखली असंच म्हणावं लागेल. कारण नुसते नायक अधिक असून चालत नाही, तर त्यांचे संवादही भरभक्‍कम असावे लागतात हेही त्यांना समजलंय. आपल्या पक्षाने सरकारमध्ये सामील व्हावं, यासाठी कुणाकुणाचा आग्रह होता इथंपासून त्यांनी संवादलेखन सुरू केले. नंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले हा भाग वेगळा; पण पहिलाच सीन सुपरहिट झाला!

या तुफान यशानंतर त्यांनी दुसरा सीन लिहायला घेतला. सरकार स्थापन करण्याला हाय कमांडचा कसा विरोध होता आणि आपण त्यांना कसं राजी केलं, याची विस्तृत माहिती दुसऱ्या सीनमध्ये त्यांनी दिली. घटनाबाह्य काम करणार नाही, असे चित्रपटातले दोन नायक तिसऱ्या नायकाकडून लिहून घेतात, असा सीन लिहून झाला. एवढंच नव्हे तर मुख्य नायकाकडून आगळीक घडल्यास इतर दोघांकडून पाठिंबा काढून घेणे हा चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स असेल, असं दाखवणारा प्रोमोही रिलीज केला. सबब, प्रमोशनचा जमाना आहे हेही आपल्याला समजतं याची जाणीव त्यांनी करून दिली. आता प्रेक्षक सरसावून खुर्चीवर ताठ बसले. तेवढ्यात नवा सिनेमा “हॉरर’ गटात मोडणारा आहे, असा रिव्ह्यू आधीच्या सिनेमाचे नायक फडणवीसांनी प्रसिद्ध केला. मंत्रालयाच्या जागी प्रेक्षकांना अचानक “पुरानी हवेली’ दिसू लागली. आजूबाजूंनी चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. कुठलातरी अतृप्त आत्मा कोणत्याही क्षणी झडप घालणार आणि मुख्य नायकाच्या नव्या मोहिमेचा खेळखंडोबा करून टाकणार, अशा चित्तथरारक सीनची प्रेक्षक वाट पाहू लागले; परंतु तसं घडलंच तरी शापित वातावरणातून बाहेर काढायला जुना मित्र तयार आहे, अशी आकाशवाणी झाली… हॉररमधलं थ्रिल संपलं!

सिनेमा कंटाळवाणा होईल आणि प्रेक्षकमधूनच उठून जातील, अशी भीती सर्वांना असणारच; पण तात्पुरती उपकथानकं जोडणारे अनेक संहितालेखक आहेत. मुख्य कथानकाचं काय करायचं, या विवंचनेत पडलेल्यांनी सर्वाधिक लोकप्रिय संवादलेखक अजित पवारांना गळ घालून पाहिली; पण “हल्ली मी प्रत्येक सीन पन्नास वेळा विचार करूनच लिहितो,’ असं उत्तर मिळाल्यानं संबंधितांचा हिरमोड झाला. चटकदार संवादांचा शोध सुरूच आहे. प्रेक्षक सलामत तो स्क्रिप्टराइटर पचास!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.