सरकारी रुग्णालयातही मिळणार “शिवभोजन’

आगामी अर्थसंकल्पात करणार निधीची तरतूद
मुंबई :  राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून राज्य सरकारने आता या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात शिवभोजन थाळीचे केंद्र तालुक्‍यातील एसटी स्थानके, सरकारी रुग्णालये, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आदी गर्दीच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या योजनेसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेने राज्यभरात 10 रुपयांची थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ही योजना सुरु करण्यासाठी जातीने लक्ष घातले.

त्यानुसार प्रजासत्ताक दिनापासून जिल्हास्तरावर 10 रूपयांत शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तीन महिने प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे. त्यानुसार राज्यभरात एकूण 18 हजार थाळी सुरु करण्याचा निर्णय प्राथमिक स्तरावर घेण्यात आला आहे.

या योजनेनुसार 122 केंद्रावर ही योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवशी 11 हजार जणांनी या थाळीचा लाभ घेतल्यानंतर याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

शिवभोजन योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तरीय एस.टी.स्थानके, शासकीय रुग्णालये, शासकीय कार्यालये, बाजारपेठा तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच त्यांची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

थाळीच्या माध्यमातून 10 रुपयांत जेवण देण्यात येत असून त्यासाठी सरकारकडून ही योजना चालविणाऱ्या संस्थांना ग्रामीण स्तरावर 25 रुपये आणि शहरात 40 रुपयांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत या योजनेसाठी 6 कोटी 48 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या काळात हा निधी वाढविण्यात येणार आहे.

जेवणाऱ्यांचे फोटो ऍपवर
शिवभोजन योजनेसाठी विशिष्ट ऍप बनविण्यात आले आहे. थाळी घेणाऱ्यांचा फोटो काढून तो ऍपवर संस्थाचालकांकडून टाकला जातो. त्यामुळे एका केंद्रावरून किती जणांनी भोजन केले याची नोंदणी केली जाते व त्याची सविस्तर माहिती ऍपद्वारे सरकारपर्यंत पोहचविली जाते. अनेक ठिकाणी थाळी लवकर संपत असल्याची तक्रार केली जात असून ती वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाढदिवशी नागरीक गोड पदार्थ वाटू शकणार
अनेक लोक स्वत:च्या वाढदिवशी गोड पदार्थ वाटतात किंवा गरिबांना जेवणही देतात. या पार्श्‍वभूमिवर लोकांना आपल्या वाढदिवशी शिवभोजन केंद्रावर गोड पदार्थ वाटप करण्याची मुभा देण्याचा विचार सरकार पातळीवरून होत आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त गरजूंना ही शिवभोजन योजनेचा लाभ कसा मिळेल, यासंदर्भात सध्या मंत्रालय स्तरावर बैठका सुरु आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.