नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरूवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आचारसंहिता लागू असताना दिलेल्या आश्वासनावरून ते पाऊल उचलण्यात आले. केजरीवाल यांना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील वकिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी न्यायालयांच्या आवारात मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याची तयारी दर्शवली. त्या आश्वासनावरून भाजपच्या एका नेत्याने केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी संबंधित आश्वासन दिल्याच्या बाबीला दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने दुजोरा दिला. त्यामुळे केजरीवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे प्राथमिक मत बनल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली.