महाविद्यालयीन निवडणुकीसाठी हालचाली

उच्च शिक्षण विभागाने मुंबईत बोलविली बैठक


निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार

पुणे – नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आता नव्याने महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका यंदाच्या शैक्षणिक वर्षात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने येत्या 17 तारखेला मुंबईत बैठक बोलाविली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची पुढच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका यापूर्वी होत होत्या. मात्र, त्यातून होणारे वाद-विवाद, मारामारीच्या घटना घडत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर 1993 नंतर ह्या निवडणुका बंद करण्यात आल्या. मात्र विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी निवडणुकांतून नेतृत्वाची फळी निर्माण होईल, या उद्देशाने पुन्हा विद्यार्थी निवडणुका घेण्याची घोषणा केली. त्याबाबतची तरतूदही नवीन विद्यापीठ कायद्यात करण्यात आली. त्यामुळे आता विद्यार्थी निवडणुका होण्यावर शिक्‍कामोर्बत झाले आहे.

दरम्यान, महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात, याविषयी माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने निवडणुकाविषयी परिनियम प्रसिद्ध करून त्यानुसार विद्यार्थी निवडणुका घेण्यात येणार आहेत. मात्र गतवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी निवडणुकांविषयी चालढकल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र विद्यार्थी निवडणुका हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील सर्व 11 अकृषी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात एकच महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकीचे वेळापत्रक निश्‍चित करण्याची योजना आखली जात आहे. त्याबाबत येत्या 17 तारखेला मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळी त्याचे स्पष्टीकरण समोर येतील.
– डॉ. प्रभाकर देसाई विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक, पुणे विद्यापीठ

Leave A Reply

Your email address will not be published.