“बीआरटी’ मार्ग सर्व वाहनांसाठी खुला

नगर, सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी निर्णय

पुणे – शहरामध्ये सुरू असणाऱ्या रस्ता आणि मेट्रोच्या कामांमुळे वारंवार वाहतूक संथ होते. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगररस्ता आणि सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि मार्गाचा वापर करावा, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी, बीआरटी मार्गावरील बंद झालेले थांबे, पीएमपीच्या बसला “बीआरटी’ मार्गातून सुमारे तीन वेळा आत-बाहेर करावा लागणारा प्रवास आणि यामुळे उद्‌भवणारी अपघातसदृश परिस्थितीमुळे नगर रस्त्यावरील “बीआरटी’ मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केली होती.
नगररस्ता आणि सातारा रस्त्यावरील बीआरटी लेनचा वापर होत नव्हता. त्याचबरोबर दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांना त्यामध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यामुळे बसेस आणि अन्य वाहनांना अपुऱ्या रस्त्यांवर धावण्याशिवाय पर्याय नव्हता. यासह वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती. परिणामी नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

तात्पुरत्या कालावधीकरिता प्रवेश
पीएमपीने केलेल्या मागणीचा विचार करत वाहतूक शाखा, पुणे महानगरपालिका, मेट्रो आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. संयुक्‍त पाहणीअंती “बीआरटी’ मार्गातून सर्व वाहनांना तात्पुरत्या कालावधीकरिता प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येरवडा येथील गुंजन चौक ते वडगाव शेरी फाटा आणि सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज मार्गावरील “बीआरटी’ लेन सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.