नवी दिल्ली – नेपाळमध्ये “सागरमाथा’ नावाने ओळखले जाणारे पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा सुरू असल्यानं नेपाळने या शिखराची उंची मोजण्याचं ठरवलं आहे. वर्ष 2015 साली नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच काही पर्यावरणतज्ञांच्या मते, जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगमुळेही एव्हरेस्टवरील बर्फ वेगाने वितळत असल्याबाबत दावाही केला होता. आता या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम नेपाळने हाती घेतलं असून मंगळवार, दि. 8 डिसेंबर रोजी यासंदर्भात अधिकृतपणे माहिती देण्यात येणार आहे.
नेपाळमध्ये वर्ष 2015 मध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेपाळने यासंदर्भात डेटा गोळा केला आहे. त्यासाठी उपग्रहांद्वारे घेतलेल्या माहिती-छायाचित्रांचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून नेपाळने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी डेटा कलेक्शनचं काम केलं आहे.
सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1954 साली घेण्यात आलेल्या मोजमापानुसार माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848 मीटर एवढी आहे. त्यानंतर, 1975 मध्ये चीनी सर्वेक्षकांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी, समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 8,848.13 मीटर अशी सांगण्यात आली होती.
नेपाळ भूगोल सर्वेक्षण विभागाने जगभरातील माध्यमांना आमंत्रण दिलं असून माऊंट एव्हरेस्टसंदर्भातील उंचीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून या कामात स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सर्वेक्षण विभागाने सांगितलं आहे.