पुणे – माउंट एव्हरेस्ट सर केलेले पुणे पोलीस दलातील कर्मचारी स्वप्नील गरड यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान “ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती, अशी माहिती पुणे पोलीस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली. पोलीस नाईक स्वप्नील गरड हे पुणे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गरड हे उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केली आहेत.
गरड यांनी गेल्यावर्षी जगातील सर्वांत सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर सर केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.
फिटनेससाठी नेहमीच सायकलचा वापर
गिर्यारोहणासाठी आवश्यक असणारा फिटनेस राखण्यासाठी गरड हे कार्यालयात सायकलने येत होते. यानिमित्त दररोज वीस किलोमीटर सायकल चालवता येत होती. तसेच कामातून वेगळा वेळही काढण्याची गरज नव्हती. यामुळे ते पोलीस आयुक्तालयात नियमितपणे सायकलने ये-जा करत होते.