भोपाळ – मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर येथे घडली. भरधाव केटीएम दुचाकी अनियंत्रीत होऊन भिंतीवर आदळली. यात मागे बसलेल्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. रेणू असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणीचे नाव आहे.
जबलपूरच्या ओमाटी पोलिस स्टेशनचे टीआय एसपीएस बघेल यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. रेणू ही मूळची सिधी येथील रहिवासी असून ती जबलपूर येथे राहत होती. शुक्रवारी रात्री उशिरा तिचा मित्र राहुलसोबत महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून जात होती. दरम्यान, नागरथ चौकाकडून येत असताना भरधाव वेगामुळे तरुणाचा दुचाकीवरील तोल सुटला आणि भरधाव वेगाने जाणारी दुचाकी शाळेच्या भिंतीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवर मागे बसलेली रेणू उडून भिंतीवरील काटेरी तारेवर पडली. रेणूच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ओमटी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी तरुणाला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले. तर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तरुणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत, जेणेकरून युवक नशेच्या अवस्थेत होता की नाही हे समजू शकेल. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.