भिगवण – येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रसंग… पुण्याहून सोलापूरकडे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसूती कळा येऊ लागल्यावर प्रवासात लगतचे गाव व समोर प्रसुतीगृह दिसल्याने बसमधून उतरविण्यात आले, हॉस्पिटलचा दरवाजा ठोठावताच डॉक्टर नसल्याचे सांगितले गेले.
इतर कोणी मदतीस येत नसल्याने बिकट स्थितीत रुग्णवाहिका चालक तिथे येऊन पाहतो, स्त्रीरोगतज्ज्ञांना विनंती करतो आणि त्यासुद्धा माणुसकी जागी ठेवत प्रसंगावधान राखत रस्त्यावरच प्रसूती करतात… ही चित्रपटतील कथा नव्हे तर भिगवणमध्ये घडलेली घटना आहे. कर्नाटक मधील त्या महिलेने भिगवणमधील माणुसकीचा पाहिली आणि तान्हुल्याने काळरात्रीत उष:काल अनुभवला!
लाइफलाइन हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगिता डेरे-भोसले व खासगी रुग्णवाहिका मालक केतन वाघ यांनी देवदूतांची भूमिका निभावत अडलेल्या महिलेची सुखरूप प्रसूती करून असाल माणुसकीचे ज्वलंत समोर ठेवले. कर्नाटकातील सीताबाई चव्हाण या नातेवाइकांसह खासगी ट्रॅव्हल्सद्वारे कर्नाटककडे जात असताना मध्यरात्री भिगवण परिसरात पोहोचताच त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या.
वेळ रात्रीची 2 वाजताची असल्यामुळे चालक आणि वाहकासमोर महिलेला उपचारासाठी कोठे सोडायचे? असा प्रश्न निर्माण झाला; मात्र गाडी सागर हॉटेलसमोर उभी करताच त्यांना शेजारी असणाऱ्या प्रसूतीगृहाचा बोर्ड दिसला. त्यामुळे त्यांना हायसे वाटून त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या नातेवाइकांना त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देत पुढील प्रवास सुरु केला. नातेवाईकांनी त्या महिलेला उचलून हॉस्पिटलसमोर जाऊन दरवाजा वाजविला आणि हाकाही मारल्या; परंतु तेथे त्या दिवशी डॉक्टर उपस्थित नव्हते.
काही उपस्थित नागरिकांनी 108 या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचाही संपर्क होवू शकला नाही. ही माहिती भिगवण आणि परिसरात रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या केतन वाघ यांना मिळाली. केतन यांनी तातडीने या ठिकाणी जावून महिलेला हॉस्पिटल मध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलेची परिस्थिती बिघडू लागल्याने केतन वाघ यांनी तक्रारवाडी येथील लाइफलाइन हॉस्पिटलच्या डॉ. योगिता भोसले यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
डॉ. भोसले या काही वेळातच या ठिकाणी पोहोचल्या तोपर्यंत महिलेला वाढलेल्या त्रासामुळे डॉक्टर भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावरच नातेवाईक महिलाच्या मदतीने बाळंतपण केले. त्यामुळे बाळाची आणि महिलेची सुखरूप सुटका झाली.
बाळ आणि मातेची सुखरूपपणे सुटका झाल्यावर केतन वाघ यांनी त्या महिलेला आणि त्या बाळाला लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये आणून पुढील उपचारासाठी दाखल केले. गर्भवती महिला आणि नातेवाईक कर्नाटकचे असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसली तरी देवदूत बनलेल्या डॉ. योगिता भोसले आणि केतन वाघ यांचे त्यांनी हात जोडून आभार मानले.