वाद घालत झाडल्या गोळ्या : पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यासाठी पथक तैनात
पारनेर – तालुक्यातील वडझिरे येथे जावयाने सासूवर पिस्तूल तीन गोळ्या झाडल्या. यात सविता सुनील गायकवाड (वय 38) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी (दि.17) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. पारनेर-आळकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी राहुल गोरख साबळे (रा. रांधे) हा वडझिरे येथील गायकवाड यांच्या घरी आला. त्याने गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादातून साबळे याने स्वतःकडील पिस्तूल काढून गायकवाड यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी गायकवाड यांच्या मानेवर, दुसरी गोळी हाताच्या पंचाला, तर तिसरी गोळी कानाजवळ घुसल्याने त्या खाली कोसळल्या. त्यांच्या मुलीने आरडा ओरड केल्यानंतर आरोपी साबळे घटनास्थळावरून पसार झाला. आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे लोक जमा झाले. त्यांनी गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले. मात्र रस्त्यातच गायकवाड यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथे हलवण्यात आला. यावेळी काही सामाजिक संघटनांनी व महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला अटक करून घटनेचा सखोल तपास होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला. मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी घटनेचा सखोल तपास होईल.
आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले जाईल, असे सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले आहे. घटनास्थळाला प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी करत आहेत.
तक्रारीची घेतली गेली नाही दखल?
सुनीता गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात न आल्यानेच आरोपीने गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याचे नातेवाईकांतून सांगण्यात येत आहे.