राज्यभरातील परीक्षार्थींमुळे शहरात गजबज !
पाथर्डी – बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला पाथर्डी शहरासह तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा पाऊस पाहायला मिळाला. तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयातील परीक्षा केंद्रावर तीन कॉपीबहाद्दरांना भरारी पथकाने रस्टीकेट केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कालपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली. पाथर्डी शहरासह तालुक्यात एकूण दहा परीक्षा केंद्र आहेत. पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला बहुतांशी परीक्षा केंद्राबाहेर कॉप्या पुरवणाऱ्यांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विशिष्ट शैक्षणिक संस्थांनी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊन त्यांच्या यशासाठी आपली विशिष्ट यंत्रणा कामाला लावल्याचे निदर्शनास आले.
प्रशासनाने कॉपी रोकण्यासाठी केलेले प्रयत्न या यंत्रणेपुढे तोकडे पडल्याचे पहावयास मिळाले. शहरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याच्या प्रशासनाकडून सूचना असूनही बहुतांशी झेरॉक्स दुकाने राजरोस सुरू होती. प्रश्नपत्रिका सोडवणारी यंत्रणा हाताशी धरून काहिंनी चढ्या भावाने झेरॉक्सच्या प्रती विकल्या. झेरॉक्स दुकानासमोर कॉप्या पुरवणारांची झुंबड उडाली होती.
परीक्षा केंद्राजवळ राज्यभरातून आलेल्या मुंबई, ठाणे, बीड, औरंगाबाद, परभणी, धुळे, रायगड यासह विविध जिल्ह्याच्या पासिंग असलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. कॉपी पुरवण्यासाठी बाहेरून पालकांची, मित्रांची गर्दी झाली होती.