हैदराबाद – कामारेड्डीमधील जंगमपल्ली येथे करोना संसर्ग झाल्याच्या शंकेमुळे गावकऱ्यांनी आई व मुलाला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. तसेच गावाबाहेरील एका शाळेत त्यांना राहण्यास भाग
पाडले. करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसतानाही गावकरांनी या दोघांना ही शिक्षा दिली.
महिलेची मुलगी प्रसूत झाल्यामुळे तिला भेटण्यासाठी मुलासह ती गेली होती.
मात्र, महिलेची मुलगी आणि नवजात शिशू करोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही माहिती गावात पसरली. जेव्हा ही महिला तिच्या मुलासह गावात पुन्हा परत आली तेव्हा गावकरांनी त्यांना गावात घुसण्यास मनाई करून जबरदस्तीने गावाबाहेर राहण्यास भाग पाडले.
गावकरांना शंका आली की हे दोघेही करोना पॉझिटिव्ह असतील. त्या महिलेने गावकरांना सांगितले की त्यांच्यात कोणतीही करोनाची लक्षणे आढळली नाहीत. तसेच ते घरातच क्वारंटाइन होणार असल्याचे
सांगितले. परंतु गावकऱ्यांनी तिचे काहीही न ऐकता त्यांना तीन दिवस गावाबाहेर राहण्यास सांगितले.
या दोघांनी त्यांना होत असलेल्या या त्रासाबद्दल व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला असून
अधिकाऱ्यांनी मदत करण्याची विनंती केली आहे.