गांधीजींचे सर्वाधिक पुतळे भारताखालोखाल अमेरिकेत

वॉशिंग्टन – महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगभरात तयारी सुरू झाली आहे. परंतु अमेरिका असा देश आहे जेथे महात्मा गांधी यांनी कधीच भेट दिली नसली तरी त्यांचे स्मारक आणि पुतळे येथे मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांचे अनुयायी आहेत ज्यात दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारताखालोखाल जगात अमेरिकेतच महात्मा गांधीजींचे सर्वाधिक पुतळे आहेत. अमेरिकेतल्या गांधीजींच्या पुतळ्यांची संख्या 24 पक्षा जास्त असून त्या देशात एका डझनाहून अधिक सोसायटी आणि संस्था गांधीजींशी संबंधित आहेत.

अमेरिकेतील प्रख्यात अनिवासी भारतीय (एनआरआय), प्रवासी भारतीय सन्मान विजेते आणि अटलांटाच्या “द गांधी फाउंडेशन ऑफ यूएसए’चे अध्यक्ष सुभाष राजदान अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्यांच्या स्थापनेच्या कामात गुंतले आहेत. राजदान यांनी सांगितले की, भारताबाहेर महात्मा गांधींचे सर्वात मोठे स्मारक आणि पुतळे अमेरिकेत असून महात्माजींशी संबंधित पहिले स्मारक केंद्र वॉशिंग्टन डीसी येथील मेरीलॅंडच्या बेथिस्डामध्ये आहे. विशेष म्हणजे हे गांधी स्मृती केंद्र अजूनही कार्यरत आहे आणि गांधींच्या विचारांचा आणि शिक्षणाचा प्रसार करत आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे भारतीय दूतावासासमोर गांधीजींचा पुतळा आहे. त्याचे अनावरण दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांनी 16 सप्टेंबर 2000 रोजी केले होते.

तर 2 ऑक्‍टोबर 1986 रोजी न्यूयॉर्क शहरातील लोकप्रिय युनियन स्क्वेअर पार्कमध्ये प्रथमच गांधीजींचा एक मोठा पुतळा बसविला गेला. गांधीजींचा पुतळा मार्टिन ल्यूथर किंग मेमोरियल सिटी पार्क, डेन्वर कोलोरॅडो; पीस गार्डन फ्रेस्नो स्टेट युनिव्हर्सिटी, फ्रेस्नो कॅलिफोर्निया येथेही आहे. महात्मा गांधी यांच्या सात फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी वर्ष 2012 मध्ये दावी फ्लोरिडा येथे केले होते. वर्ष 2017 मध्ये लायन्स इंटरनॅशनलच्या मुख्यालयात इलिनॉयमध्ये महात्मा गांधींचा पुतळा बसविला गेला.

स्मारके अथवा पुतळ्यांव्यतिरिक्त अमेरिकेत मोठ्या संख्येने लोक गांधीजींचे अनुयायी आहेत. यात निग्रोंच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मार्टिन ल्यूथर (ज्युनियर) यांचाही समावेश आहे. गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या शिकवणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि इतर अनेक नेते महात्मा गांधींच्या विचारांचे अनुयायी आहेत. त्यामुळेच अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्यांची संख्या मोठी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.