ह्यूस्टन पोलीस फोर्स आणि युएस आर्मीने उधळला डाव
वॉशिंग्टन- अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये झालेल्या “हाऊडी मोदी’ या ऐतिहासिक कार्यक्रमाची, संपूर्ण जगाला उत्सुकता होती. मात्र, या कार्यक्रमासाठी कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीवरुन हा कार्यक्रम उधळण्यासाठी अमेरिकेतील पाकिस्तानी नागरिकांनी प्रयत्न केला होता. मात्र, दोन राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीला गालबोट लागू नये म्हणून अमेरिकन सुरक्षा व्यवस्था आणि संयोजन समितीने घेतलेल्या दक्षतेमुळे हा कर्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कार्यक्रमाचे पूर्ण नाव “हाऊडी मोदी : शेअर्ड ड्रिम्स + ब्राईट फ्युचर’ असे होते. मात्र या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या, “टेक्सास इंडिया फोरम’ चे एकही बॅनर स्टेजवर किंवा जवळपास नव्हते. मागील चार महिन्यापासून या कार्यक्रमाची पूर्वतयारी ह्युस्टनमध्ये सुरू होती.
सर्वप्रथम 50 हजार प्रेक्षकांची उपस्थिती हे उद्दिष्ट ठरल्यावर योग्य आयोजन आणि अंमलबजावणी यासाठी स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया “टेक्सास इंडिया फोरम’ने केली. कार्यक्रमाबाबत विविध मार्गदर्शक सूचना निवडलेल्या स्वयंसेवकांना ईमेलवर येत होत्या. कार्यक्रमाच्या दोन महिने आधी एक संघर्षपूर्ण अडचण निर्माण झाली. ह्युस्टनमध्ये, कारमधले रेडिओ सुरू केले की अनेक लोकल पाकिस्तानी चॅनेल्स सुरू होतात.
या चॅनेल्सवरून पाकिस्तानी व्यक्तींना आवाहने केली जात असल्याचे दिसून आले. “जर भारतीय नागरिक “हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी एकत्र येणार असतील, तर एनआरजी स्टेडियम समोर एक लाख पाकिस्तानी नागरिकांनी एकत्र जमावे आणि भारतीय पंतप्रधानांचा कार्यक्रम उधळून लावावा,’ अशा आशयाचे प्रक्षोभक संदेश प्रसारित केले जात होते.
हे पाहताच संयोजन समिती त्वरित सतर्क झाली. ह्यूस्टन पोलीस फोर्स आणि युएस आर्मीने मग वेगवेगळ्या उपाय योजना सुरु केला. संयोजन समितीमधील सर्व स्वयंसेवकांनी व्हाट्सऍप, इमेलवरील सूचना इतरत्र, कुठेही, कोणालाही, पाठवायच्या नाहीत. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली की ईमेल/मेसेज डिलीट करावयाचा. सर्वच भारतीय स्वयंसेवकांनी, सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली. या दक्षतेमुळे आयोजनात काय चालू आहे ते, बहिष्कार घालणाऱ्यांना कळणे कठीण गेले.
भारतीयांना एनआरजी स्टेडियममध्ये प्रवेश पत्रिका दिल्यानंतरही हजारो भारतीयांना कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याची इच्छा होती. मग बाहेरच्या प्रेक्षकांसाठी, वेगळ्या स्टेजवर, वेगळा भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम चालू ठेवला गेला. ज्यांना आत प्रवेश मिळाला नाही ते, स्क्रीनवर मुख्य कार्यक्रम लाईव्ह बघत होते. या भारतीयांना स्वयंसेवकांमार्फत सूचना दिल्या होत्या, जर पाकिस्तान समर्थक जमले व घोषणा देऊ लागले तर असंख्य जमलेले भारतीय मोठ्याने घोषणा देतील आणि पाक समर्थकांच्या घोषणा विरुन टाकतील. याला ‘टीम आर्मी’ असे नाव देण्यात आले होते.
अखेर ह्यूस्टन पोलीस व युएस आर्मीने पाक धार्जिण्यांना, कार्यक्रमाच्या जवळपासही फिरकू दिले नाही. सुमारे एक किलोमीटर अंतरावर पाकिस्तानी, आणि त्यांना घेरून शेकडोच्या संख्येने ह्यूस्टनचे पोलीस अशा कडक सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
(सोअर्स : डेलीमेल)