- पुढील दोन दिवस ढगाळ हवामान, गारवा
- पुण्यात सरासरीपेक्षा 28 टक्के जास्त वृष्टी
पुणे : – हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यावर्षी पुण्यात सरारीपेक्षा 28 टक्के अधिक पावसाची नोंद विभागाने केली आहे. दरम्यान, शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने रविवारी उघडीप दिली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा जाणवत होता. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यंदा सरारीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नगर जिल्ह्यात आतापर्यंत 106 मिमी अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ सोलापूर-72, तर मुंबई- 66 मिमी अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात दि.1 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत शिवाजीनगर येथे 525.1, लोहगाव-557.9 तर पाषाण-468.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, एकीकडे पावसाबाबत असे समाधानकारक चित्र दिसून येत असतानाच, राज्यातील काही जिल्हे मात्र अजूनही सरासरी गाठू शकले नाही. यामध्ये अकोला (-26), यवतमाळ (-23), गोंदिया (-21) या जिल्ह्यांची स्थिती गंभीर आहे. तर नांदेड, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत हे चित्र बदलण्याची अपेक्षा आहे.