चिबळी (पुणे) – नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व मोशी येथील टोल नाके अखेर बंद करण्यात आले आहेत. मुदत संपल्याने येथील वसुली बंद करण्यात आली आहे.
तब्बल सोळा वर्षे आठ महिने पंचावन्न दिवस एवढा काळ हे टोल नाके होते. नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते ते बंद झाल्याने नाशिक फाटा ते खेड पर्यंतचा रस्ता आता टोलमुक्त झाला आहे.
शुक्रवार (दि.८) रोजी रात्री बारा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोशी व चांडोली येथील टोल वसुली बंद करण्यात आली. नाक्यावर बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वसुली बूथ देखील बंद करण्यात आले आहेत. सदर टोल नाके बंद करण्यात आले असून हस्तांतरण प्रक्रिया शनिवार, रविवार सुट्टी असल्याने सोमवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतचा रस्ता गॅजेटनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे अशी माहिती मोशी टोल नाका प्रशासनाकडून देण्यात आली.