पिंपळे गुरव – दापोडी येथील मुस्लिम दफनभूमीची झालेली दुरवस्था आणि ड्रेनेजलाइनचे चेंबर तुटल्याने दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत आहे. याबाबत दै. प्रभातने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परिणामी महापालिकेने येथील दफनभूमीचे साफसफाई व चेंबर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
दैनिक प्रभातच्या वृत्तानंतर महापालिकेने आरोग्य व स्थापत्य विभागाने सुरू केलेल्या कामामुळे नागरिकांनी प्रभातचे विशेष आभार मानले. पवना नदी किनारी तुटलेली चेंबर, भेगा पडलेली सीमाभिंत, वाढलेले गवत व दुर्गंधीमुळे दफनभूमीची दुरवस्था झाली होती. महापालिकेच्या वतीने दहा वर्षांपूर्वी या मुस्लिम दफनभूमीचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दफनभूमीची देखभाल दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. भेगा पडलेली सीमाभिंत कधी कोलमडेल हे सांगता येत नाही. ही दफनभूमी पवना नदी किनारा भागात असल्याने जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
ड्रेनेजलाइनचे चेंबर तुटल्याने दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत होते. अडगळीमुळे दफनविधीसाठी जागा अपुरी आहे. मोकळी जागा असूनही त्याठिकाणी प्लॅटफॉर्म बनविण्यात आले नसल्यामुळे अंत्यसंस्काराची अधिकची जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम नागरिकांकडून होत होती.
तडे गेलेली सीमाभिंत खचलेली आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, येथील दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने “ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडे करण्यात आली होती. सध्या महापालिकेच्या वतीने येथील दफनभूमीचे काम सुरू केले आहे.