पुणे – दाखल्यांसाठी सेतू केंद्रात गर्दी होऊ नये; कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, घराजवळील केंद्रातून नागरिकांना ऑनलाइन दाखले मिळावेत, यासाठी विविध प्रकारचे दाखले देण्याची सुविधा महा-ई-सेवा केंद्रांमार्फत पुरवली जाते. मात्र, आता काही केंद्रांतून दाखल्यांसाठी जादा पैसे आकारल्याच्या तक्रारी येत आहेत.
उत्पन्न दाखल्यासाठी 33 रुपये 60 पैसे आकारणे आवश्यक आहे. पण, नागरिकांकडून तब्बल 300 ते 700 रुपये वसूल करण्यात येत असल्याची कैफियत काही नागरिकांनी मांडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात. तसेच शाळा, महाविद्यालयात प्रवेश, आरटीई प्रवेश, शहरी गरीब योजना, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणे, आदी कारणांसाठी उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रात दाखले घेण्यासाठी नागरिक अर्ज करतात.
आदेशांना केराची टोपली
शाळा प्रवेश आणि वैद्यकीय कारणासाठी दाखला मिळावा, यासाठी अर्जांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नागरिकांची गरज ओळखून महा-ई-सेवा केंद्र चालक जादा पैसे आकारतात. जिल्हा प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही महा-ई-सेवा केंद्र बंद करण्यात आले. तसेच जे केंद्रचालक अथवा कर्मचारी दरपत्रकापेक्षा जादा रक्कम आकारतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र याचा फरक पडलेला दिसत नाही.
नागरिकांच्या तक्रारी..
शहर-उपनगरांतील बहुसंख्य महा-ई-सेवा केंद्रचालक नागरिकांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 300 ते 400 रुपये घेत आहेत. तर, रहिवासी दाखल्यासाठी 400 रुपये घेत आहेत. तर नॉन क्रिमी-लेअर प्रमाणपत्रासाठी 700 रुपये काही केंद्र चालकांनी आकारल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.
दाखल्यांसाठी शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक
ऑनलाइन सेवा दर कालावधी
उत्पन्न दाखला 33 रुपये 60 पैसे 15 दिवस
रहिवास प्रमाणपत्र 33 रुपये 60 पैसे 15 दिवस
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 33 रुपये 60 पैसे 15 दिवस
नॉन क्रिमी-लेअर प्रमाणपत्र 57 रुपये 20 पैसे 21 दिवस
जातीचा दाखला 57 रुपये 20 पैसे 45 दिवस
ईडब्लूएस प्रमाणपत्र 33 रुपये 60 पैसे 21 दिवस