कहर ! पुण्यात अंत्यविधीला १०० हून अधिक लोक; नातलगांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायले

पुणे – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक निर्बंध लागू केले आहेत. तसेच नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत असून पुण्यातून नियम डावलण्याचं प्रकरण समोर आलं आहे. येथे अंत्यविधीला १०० हून अधिक लोकांनी हजेरी लावल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुण्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी २५ तर अंत्यविधीसाठी २० लोकांना उपस्थित राहता येईल असा नियम करण्यात आला आहे. मात्र या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावल्याचं समोर आलं आहे.

वृद्धाच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करताना मृताच्या नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायल्याचं उघड झालं आहे. एकूणच नागरिकांकडून शासनाने लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.