सुनील राऊत
पुणे : करोनाबाधित वेळत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने प्राण गमवावे लागत असतानाच; विमा कंपन्यांकडून करोना रूग्णांच्या बिलांचे विमा रक्कम सेटलमेंट करण्यास होत असल्याची दिरंगाई मुळे अनेक डिस्चार्ज होणाऱ्या रूग्णांना हॉस्पीटलमध्येच थांबावे लागत आहे. त्यामुळे, पुढील गरजू रूग्णांना बेड मिळण्यास उशीर होत असल्याचे समोर येत आहे. शहरातील अनेक खासगी रूग्णालयांमध्ये असे रूग्ण असून त्यांची बिले वेळेत मिळाल्यास अनेक रूग्णांचे प्राण वाचू शकणार आहेत.
शहरात मागील वर्षी करोनाच्या साथीने थैमान घातले होते. शहरात जून ते ऑक्टॉबर 2020 च्या दुसऱ्या आठवडयापर्यंत मोठया प्रमाणात नवे करोनाबाधित सापडत होते. त्यानंतर ही साथ उतरणीला लागली होती. मात्र, या साथीत अनेकांना उपचारांच्या बिलांचा झटका बसल्याने त्यानंतर अनेकांनी करोनावरील उपचारासाठी विम्याचा पर्याय निवडला होता. त्यात, अनेक खासगी विमा कंपन्यांनी आकर्षक सुविधा देत पॉलिसी दिल्या होत्या. या पॉलिसाचा फायदा शहरात आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेकांना झाला असून खासगी हॉस्पीटलची लाखो रूपयांची बिले विम्यातून दिली जात आहेत. मात्र, आता विमा कंपन्यांकडे दररोज वाढणाऱ्या रूग्णांच्या बिलांचा भार वाढल्याने अनेक रूग्णांचे विमा क्लेम सेटल होण्यास 24 तासांपेक्षा अधिक कालावधी जात आहे. परिणामी हॉस्पीटलही संबधित रूग्णास पैसे मिळाल्याशिवाय, घरी सोडत नसल्याने शहरातील अनेक हॉस्पीटलमध्ये बेड अडकून पडले आहेत.
वेळेत बेड न मिळाल्याने ओढावताहेत मृत्यु
एका बाजूला विमा कंपनीकडून बील मिळे पर्यंत करोनातून बऱ्या झालेल्या रूग्णाला हॉस्पीटल घरी सोडत नाही. त्यामुळे विनाकारण विम्यासाठी बेड अकडून पडत आहेत. त्याच वेळी शहरात गेल्या काही दिवसांपासून हॉस्पीटल तसेच बेड मिळत नसल्याने रूग्णालय तसेच ऍम्ब्युलन्स मध्येच प्राण सोडत आहेत. अशा स्थितीत विमा कंपन्यांकडून तातडीन क्लेम सेटल झाल्यास अनेकांना बेड मिळू शकणार आहेत.
अशी असते विमा प्रक्रीया
रूग्ण हॉस्पीटलमधे दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून विमा असल्याची माहिती हॉस्पीटलला दिली जाते. दाखल झाल्यानंतर 12 ते 24 तासात हॉस्पीटल विमा कंपनीशी संपर्क साधते. त्यानंतर डिस्चार्ज पूर्वी हॉस्पीटलकडून कंपनीस बील पाठविले जाते. त्यात, कंपनीच्या नियमांनुसार, कोणता खर्च दिला जाईल, किती दिला जाईल हे निश्चित करून हॉस्पीटलला कळविले जाते. मात्र, आता राज्यभरात क्लेमची संख्या वाढल्याने विमा कंपन्यांवरही ताण येत असून क्लेम सेटलमेंट होण्यास दिड ते दोन दिवसांचा कालावधी लागत आहे.
माझे एक नातेवाईक 10 दिवस झाले. एका खासगी रूग्णालयात आहेत. त्यांनी करोनाची कॅशलेस उपचाराची पॉलिसी घेतली होती. त्यांना, शनिवारी डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, कंपनीचा क्लेम शनिवार व रविवारीही मंजूर झाला नाही. त्यामुळे त्यांना सोमवार दुपार पर्यंत रूग्णालयातच ठेवले. त्यांना शनिवारीच डिस्चार्ज मिळाला असता तर त्यांचा बेड इतर रूग्णाला मिळाला असता. – प्रविण पगारे ( हेल्प राईडर ग्रुप सदस्य)