ब्लांटायर (मलावी) – मोझंबिक आणि मलावी या देशांना “फ्रेडी’ वादळाने झोडपून काढले आहे. गेल्या आठवड्यापासून या वादळाचा तडाखा या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे. आता हे वादळ हळूहळू क्षीण व्हायला लागले आहे.
या वादळामुळे दोन्ही देशांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो जणांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. आता हे वादळ मलावीपासून दूर जात असल्यामुळे विस्थापित झालेले हजारो नागरिक पुन्हा आपल्या मूळ गावी परत यायच्या तयारीत आहेत.
मलावीमध्ये “फ्रेडी’ वादळामुले किमान 199 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ब्लेंटायरमद्येही मोठी जीवितहानी झाली आहे. तर शेजारील मोझंबिकमध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शनिवारी रात्री हे वादळ मोझंबिकमधील किलीमाने बंदरात थडकले होते. तेंव्हापासून वादळी वारे आणि मुसळधार पावसाने या दोन्ही देशांना झोडपले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलावी, मोझांबिक आणि मादागास्करमध्ये फ्रेडी चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.