पुणे – शहरात मॉर्निंग वॉक करणे अधिक सुरक्षित होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता पोलीस मॉर्निंग वॉक करणार आहेत. यासाठी मॉर्निंग वॉक स्काॅड नेमण्यात येणार आहे. शहरातील 32 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 85 ठिकाणी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, दोन उपायुक्त, 28 पोलीस निरीक्षक, 47 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 222 पोलीस अंमलदार यांनी मॉर्निंग वॉक पेट्रोलिंग केली. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
रितेशकुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ अशा गर्दीचे ठिकाणी पोलीस उपस्थिती वाढविण्यास भर दिला जात आहे. यामध्ये आता मॉर्निंग वॉकच्या ठिकाणाची भर पडली आहे. त्यामुळे गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंगसाठी तसेच मॉर्निंग वॉक स्कॉड नेमण्यात येत आहे.
जेणेकरून गुन्ह्याला प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स्टाफसह विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. तेथे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्येचे निराकरण करणार आहेत.