पुणे – केरळ किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. ते सक्रिय झाल्यास मान्सूनचे केरळातील आगमन नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस आधी म्हणजे 28 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनला चालना मिळाली आणि रविवारी तो दक्षिण अंदमानात दाखल झाला. त्यानंतर अद्याप मान्सूनची प्रगती झालेली नाही. चक्रीवादळामुळे प्रभावित प्रवाह सुरळीत झाल्यानंतर म्हणजे गुरुवारनंतर अंदमानातील इतरही भागांत मान्सून दाखल होईल.
अम्फान चक्रीवादळ आता निवळले असले तरी अरबी समुद्रातील दक्षिण पूर्व भागात 2.1 किलोमीटर अंतरावर आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे. या वादळाची तीव्रता किती आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. हे वादळ समुद्रसपाटीपासून आठ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे अद्याप ही यंत्रणा तयार होत आहे. ती कार्यान्वित झाल्यानंतर याबाबतचा स्पष्ट अंदाज देता येईल.