इस्लामाबाद – पाकिस्तानच्या संसदेमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, हा अर्थसंकल्प संसदेकडून मंजूर होण्यापूर्वी त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या जातील, अशी आशादेखील नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
संसदेमध्ये अर्थमंत्री इसाक दर यांनी 14.4 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात मांडला आहे. या अर्थसंकल्पामध्ये पाकिस्तानने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करायला हवा, अशी अपेक्षा नाणेनिधीचे निवासी प्रतिनिधी इस्थर पेरेझ रुइझ यांनी म्हटले होते.
नाणेनिधीकडून 2019 च्या “एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी’अंतर्गत अजूनही पाकिस्तानला 2.5 अब्ज डॉलरचा निधी देणे बाकी आहे. या सुविधेची मुदत येत्या जून महिन्याच्या अखेरीस संपणार आहे.
त्यापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कररचनेने निराश केले असल्याचे रुइझ यांनी म्हटले आहे. नक्की कोणत्या योजनेतील तरतुदीविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, हे मात्र स्पष्ट केले गेलेले नाही.