घोडेगाव – येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन सोमवारी दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या कामासंदर्भात दैनिक प्रभातने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन रुग्णालयाचे उद्घाटन होत आहे.
नेवासा तालुक्यातील औरंगाबाद-नगर महामार्गावर असलेल्या घोडेगाव येथे घोडेगाव परिसरासह तालुक्यातील रुग्णांना मध्यवर्ती ठिकाणी व प्रशस्त जागेत सर्व सोयी सुविधायुक्त असे 30 बेडच्या सुमारे 9 कोटी 35 लाख रुपये किंमतीच्या या रुग्णालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला होता, परंतु मंत्री गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला आहे.
मध्यंतरी करोना महामारी व निधीच्या अभावामुळे रेंगाळलेल्या या कामास गती मिळून ते लवकर पूर्णत्वास यावे, म्हणून मंत्री गडाख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सिव्हिल सर्जन यांना तत्काळ आदेश देऊन कामास गती देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यात आली. या कामासाठी येणाऱ्या निधीसह सर्व अडचणी मंत्री गडाख यांनी दूर केल्यामुळे आज सुसज्ज अशी वास्तू उभी राहिली आहे.
अद्ययावत बांधकाम व सर्व सोयीं-सुविधानी परिपूर्ण अशा या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांना शस्त्रक्रिया, लहान मुलांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, औषध विभाग, बाह्यरुग्ण, आंतररुग्ण कक्ष, माता संगोपन, प्रयोगशाळा, प्रसूतिगृह, क्ष-किरण विभाग, कुटुंब कल्याण, नेत्रतपासणी असे विविध विभाग आहे.
नगर- औरंगाबाद महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने अपघाताचे प्रमाणही थोडेसे वाढलेले आहे. या महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णाला नगरला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचून त्वरित उपचार मिळणे शक्य होणार आहे. मात्र, दुर्दैवाने अपघातात रुग्णाचा मृत्यू झाल्यास या ठिकाणी शवविच्छेदन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून परिसरातील नागरिकांकडून मागणी होत होती. मात्र, पूर्वीच्या कामात ही सुविधा नसल्यामुळे गडाख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ही बाब लक्षात आणून दिली.
या ठिकाणी पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित अनुभवी स्टाफची नियुक्ती होऊन रुग्णांना तपासण्यासाठी लागणारी अद्ययावत मशिनरी व इतर साहित्यासह हे रुग्णालय सुरू होणार आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना, रुग्णांना मोठी मदत होणार आहे. मंत्री गडाख यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.